top of page
Search

पर्यावरणाची फसवणूक - वृक्ष लागवड आणि महावृक्ष तोड

Updated: Oct 6, 2020

जागतिक वन्यजीव सप्ताह विशेष;

प्रणव महाजन, प्लानेट अर्थ फौंडेशन


सध्या ऑक्टोबर महिन्याची सुरुवात असल्यामुळे सर्वत्र हिवाळा व निसर्गामध्ये फुलांची मनमोहक द्रुश्य दिसू लागली आहेत. शेतकरी आनंदात भात काढणीच्या मागे लागले आहेत. शेतकऱ्यांची दिवाळीची तयारी सुरू झाली आहे, त्या बरोबरच दरवर्षी घडणारी गोष्ट म्हणजे सर्वत्र पावसाळी वृक्ष लागवड करून झाली असेल व त्यातील सर्रास रोपे गवतात गुडूप झाली असतील. या लेखामध्ये आपण वृक्ष लागवड आणि महा वृक्ष संवर्धन यांचा संबंध जाणून घेऊयात.


चांदोली अभयारण्य मध्ये जनीचा आंबा नावाने प्रसिद्ध असलेले अब्याचे भले मोठे झाड.

लोकांचा वृक्ष लागवडी मागचा पर्यावरण संवर्धनाचा विचार निश्चित चांगला आहे. पण या मागची शास्त्रीय बाजू सर्वांनी विचारात घ्यायला हवी.आपण जे वृक्ष लागवड करतो, त्याचा नक्की पर्यावरणाला शंभर टक्के फायदा होतो का? याचा विचार व्हायला हवा. प्रशासन, पर्यावरण अभ्यासक आणि इतर लोक वृक्षलागवडीचा मोठ्या प्रमाणात आग्रह धरत आहेत. पण हे करत असताना आपण आपल्या जवळपास असणाऱ्या वृक्षलागवड पेक्षाही महत्त्वपूर्ण गोष्टी विसरत आहोत. जून ते सप्टेंबर या महिन्यात सर्वसाधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात लाखो रोपांची लागवड होत असते. यादरम्यान लोकांकडून मोठ्या प्रमाणात फळझाडे आणि कलमांची लागवड होते. पण हे सर्व करत असताना आपल्या हातून सुटून जात असलेली गोष्ट म्हणजे महावृक्ष किंवा मोठे वृक्ष. दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे या विभागात वर्षभरात लाखो महावृक्ष तोडले जात आहेत. यामध्ये शास्त्रीय आकडेवारीचा विचार केला तर, असे समजते की ज्यावेळी एक महावृक्ष तोडला जातो, त्याच वेळी त्याची संपूर्ण परिसंस्था म्हणजे त्या झाडांवर अवलंबून असणारे असंख्य सूक्ष्मजीव, कीटक, पक्षी, प्राणी, मिळून तयार होणारी इकोसिस्टीम, चा नाश एका क्षणात केला जातो. शासनाने व नागरिकांनी त्याचा एक झाड म्हणून विचार न करता एक परिपूर्ण परिसंस्था म्हणून विचार करणे गरजेचे आहे. सामान्य नागरिक म्हणून आपण त्याच्याकडे सर्वसाधारण झाड म्हणून पाहत असतो. त्याच्याशी संबंधित न दिसणाऱ्या अश्या अनेक महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला डोळ्याआड जातात आणि त्यांचा विनाश होतो.


शिराळा येथील लाकूड गिरणीच्या जागेत मृत अवस्थेत पडलेले काटे सावरीचे ४.५ मीटर घेर असलेले व कमीतकमी १०० वर्अ वय असलेले अजस्र झाड


एका वृक्षाचे वजन सर्वसाधारणपणे १ ते २ टन च्या दरम्यान असते. तसेच त्याच्यावर विविध पक्षांची घरटी, मुंग्यांचे वस्तीस्थान, सापांची बिळे, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक व सूक्ष्मजीव, इत्यादी असतात. तसेच हे महावृक्ष वर्षभरात एकदा तरी फुले व फळे देतात, तसेच वर्षभर हवेतील कार्बनडाय ऑक्साईड शोषून ऑक्सिजन सोडून निसर्गात महत्त्वाची भूमिका निभावतात. या सर्वांमधून निसर्ग चक्र सुरळीत होत असते. तसेच या वृक्षांच्या परिघामध्ये नैसर्गिक रित्या तयार झालेली अनेक लहान रोपे सापडतात. ही नैसर्गिक रित्या तयार झालेली सर्व रोपे निसर्गतः शक्तिशाली, लवकर वाढ होणारी, रोग प्रतिकारक, चांगले जनुक असणारी असतात. तसेच अशा महावृक्षवर तांबट, गरुड, शराठी, धनेश इत्यादी असंख्य प्रकारच्या पक्ष्यांचे आश्रयस्थाने असतात. त्याला इंग्रजीमध्ये नेस्टिंग व रूस्ठींग साईट असे बोलतात. जेव्हा आपण आपल्या स्वार्थासाठी कोणताही एक महावृक्ष तोडत असतो, तेव्हा या सर्व गोष्टींचा आपण अनावधानाने नाश करीत असतो. या सर्वांमध्ये असणारा महत्वपूर्ण सहसंबंध नष्ट करीत असतो.


संस्थेतील एका प्रकल्पामध्ये वृक्सारोपण करत असलेले सदस्य


यामुळे आपण समजून घेणे महत्त्वाचे ठरते की, एक महावृक्ष तोडल्यानंतर त्याच्या जागी पन्नास रोपे लावली तरी ती तोडलेल्या महावृक्ष ची जागा घेऊ शकणार नाहीत. सामान्यपणे झाडाच्या वजनाचा विचार केला तरी एक हजार रोपांचे वजन एका महावृक्षा इतके भरणार नाही. सर्वसाधारण पणे लावलेल्या रोपांना महावृक्षाची जागा घेण्यासाठी शेकडो वर्षे जावी लागतात.


महावृक्षामुळे पर्यावरणाला होणारे फायदे, झाडांची रोपे लावून मिळू शकत नाहीत. सर्वसाधारणपणे लहान रोपा पासून महावृक्ष होईपर्यंत मानवाची एक पिढी जावी लागते. त्यामुळे मी महावृक्ष तोडून, त्याच्या बदली लहान दहा रोपे लावतो ही गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या पर्यावरणाला न परवडणारी आहे. त्यामुळे स्वतःची फसवणूक आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी वृक्षतोड आणि वृक्षलागवड याचा संबंध समजून घेणे महत्त्वाचे ठरते. आपण बघतो कि बरेच वेळा वृक्ष लागवडी मध्ये एकसारख्या प्रकारची झाडे ठराविक अंतर ठेवून लावली जातात. यामध्ये एकाच जातीची कलमे वापरली जातात. मुळातच कलमे ही हायब्रीड जातीचे असून ती जगवण्यासाठी खते, कीटकनाशके, इतर केमिकल वापरावी लागतात. त्यामुळे तेथील नैसर्गिक जैवविविधता नष्ट होते. कलमांची वाढ ही ठराविक मर्यादेपर्यंत होत असते आणि निसर्गात त्यांना जगवावे लागते, स्वतः हुन ती जगत नाहीत. तसे पाहिले तर मोठ्या प्रमाणात लागवड होणाऱ्या कलमांचा निसर्गाला होणारा फायदा फार कमी प्रमाणात असतो. त्याबरोबरच हे सर्व तोडले जाणारे महावृक्ष नैसर्गिकदृष्ट्या लाख रुपये किमतीचे असतात. तरी त्यांना बाजारात जळाऊ लाकडाच्या किमतीने कवडीमोल भावाने विकले जाते. सर्वसाधारण त्याचा भाव काढला असता समजते की बांधावरचा एक महावृक्ष शेतकऱ्यांनी विकला तर त्याला दीड ते दोन हजार रुपये मिळतात.

चांदोली भागातील एका देवराई मध्ये शेकडो वर्ष वय असलेला महावृक्ष


महावृक्ष तोडली जाण्याची कारणे फार विविध आणि विचित्र प्रकारची दिसतात. मोठ्या प्रमाणात वृक्ष शेतीचे विस्तारीकरण करण्यासाठी तोडले जात आहेत. यामध्ये ऊसाचे क्षेत्र वाढवण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसतो. एका अभ्यासात असे समोर आले आहे की, शेतकरी बऱ्याच वेळा उसाचे उत्पन्न वाढवण्यासाठी वृक्षतोड करतात. पण यामुळे उत्पन्नात वाढ न होता वृक्षतोडीमुळे विहिरीचे पाणी कमी होणे, जमिनीची उत्पादन क्षमता कमी होणे, सुपीक माती वाहून जाणे, तणांचा आणि किडींचा प्रादुर्भाव जास्त होणे असे विपरीत परिणाम समोर येत आहेत. प्रत्यक्षात ऊसाचे उत्पन्न एक टन इतकेच वाढलेले असते. शेतकऱ्यांनी यामध्ये शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी बांधावरचे वृक्ष तोड करण्याऐवजी शास्त्रीय पद्धतीने अचूक शेती करणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि वृक्षतोड ही करावी लागणार नाही. शास्त्रीय पद्धतीने शेती केली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येते.

३२ शिराळा या ठिकाणी आजही जिवंत व उभा असलेला गोरखचिंच या प्रजातीचा महावृक्ष


या महा वृक्षतोडीच्या प्रकारांमध्ये एकमेकाला म्हणजेच वनविभाग, लाकूड गिरण्या, कृषी विभाग, शेतकरी , साखर कारखाने, तसेच प्रशासन यांना जबाबदार ठरवून उपयोग होणार नाही. हे सर्व महावृक्ष मोठ्या प्रमाणात खाजगी जमिनीवर असल्यामुळे वनविभाग हतबल ठरतो. लोकांनी वृक्षतोडीसाठी आणि वाहतुकीसाठी परवानगी मागितली तर ती वनविभागाला द्यावी लागते. ती मिळवण्यासाठी लोक विविध कारणे सांगतात. यामुळे महावृक्ष वाचवण्यासाठी ज्याच्या जमिनीवर झाड आहे, त्याची जागृती करणे महत्त्वाचे ठरेल. त्याच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवणे यामुळेच बांधावरचे महावृक्ष वाचतील हे स्पष्ट होते.

प्रणव महाजन,

उपाध्यक्ष,

प्लानेट अर्थ फौंडेशन,

M.Sc. Environmental Science,

90 views0 comments
bottom of page