top of page
Search

"कोरोना समजून, जाणून घ्या व त्याची अवास्तव भीती कमी करा"

डॉ. नितीन जाधव, MD. Medicine, ३२ शिराळा


गेले सात- आठ महिने कोरोना covid-19 या विषाणूच संकट वैश्विक साथीच्या रुपात सर्व जगावर कोसळले आहे. त्यामुळे सर्व जगाला शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक ताण-तणावाला सामोरे जावे लागले आहे. यातून सर्वजण हळू-हळू सावरत आहेत, तरीसुद्धा हे संकट कमी होत नाही. भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये याचा फैलाव अजूनही वाढत आहे. शासन, सरकारी यंत्रणा, आरोग्य खाते, खाजगी वैद्यकीय व्यवस्था, कोव्हीड नर्सिंग टीम, सफाई कामगार, पोलीस, सैनिक, व राजकीय पक्ष आपापल्या परीने या संकटाचा सामना करत आहेत. यातून सामान्य माणसाने कसे वागावे, काय करावे व काय करू नये हे जाणून घेणे अति महत्वाचे आहे. गेल्या दोन महिन्यापासून शिराळा उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पेशंट सोबतचा अनुभव लक्षात घेता कोरोना या महामारी बद्दल काही मुद्दे महत्वाचे वाटतात ते थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.

कोरोना , covid-19 या व्हायरस मुळे होणारा आजार कोणालाही होऊ शकतो, जात, धर्म, पंथ, वर्ग वगैरे काहीही न पाहता हा कोणालाही संसर्ग करू शकतो. सद्यस्थितीत ज्या पद्धतीने कोरोनाचा प्रसार झालेला आहे त्यामध्ये कोणताही व्यक्ती अस म्हणूच शकत नाही की मला कोरोना आजार कधीच होणार नाही. यासाठी कोरोनाबाबतच्या खालील गोष्टी प्रत्येकाने ध्यानात ठेवायलाच हव्यात..🙂


🌷 मास्क न घालणाऱ्या, गर्दीत विनाकारण फिरणाऱ्या, इतरांपासून 2 मीटर सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या, सॅनिटायझर न वापरणाऱ्या व हात वारंवार न धुणाऱ्या लोकांना नक्की कोरोना होणारच.



🌸 आपल्याकडून इतराना कोरोना होऊ नये म्हणून आपण जर कोरोनासदृश्य लक्षणे (ताप,अंग दुखणे, खूप अशक्त वाटणे,कोरडा खोकला, श्वसनास त्रास,चव वास् न जाणवणे, ई...) असा कोणताही त्रास असेल तर आपण तात्काळ स्वतः N95 मास्क वापरा, लवकरात लवकर , रैपिड एंटीजन टेस्ट,आणि गरज पडल्यास आर.टी. पी.सी.आर टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने करा, पॉझिटिव्ह आली किंवा निगेटीव्ह आली तरीही स्वतःला 14 ते 21 दिवस घरीच आयसोलेट-विलगिकरण करा. लक्षणे असणाऱ्या सर्वच पेशंटनी (पॉझिटिव्ह व निगेटीव्ह) स्वतःला आयसोलेट ठेवायलाच हवे.



☘️आपल्या प्रत्येकाच्या घरात चांगल्या प्रतीचे पल्स ऑक्सिमिटर व थर्मामिटर उपकरण जरूर ठेवा, रोज स्वतःचे, आपल्या घरातील लोकांचे व आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांचे तापमान व ऑक्सिजन लेवल पहा, ज्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण 95% पेक्षा जास्त आहे, असे सर्व लक्षणे असलेले किंवा नसलेले सुद्धा, पॉझिटिव्ह, निगेटीव्ह पेशंटचे सर्व उपचार घरातच करता येतात. आपल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा खाजगी डॉक्टर्स याचा इलाज घरातच करू शकतात. असे 100 पैकी 80% कोरोना रुगणांचे उपचार घरातच होत असल्याने याला अजिबात भिण्याचे काहीच कारण नाही. परंतु असे लक्षणेविरहीत लोक आपण पॉझिटिव्ह असूनही गावभर फिरत राहिल्याने, किंवा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील इतर लोकांनी व्यवस्थित काळजी न घेतल्याने हा कोरोनाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर इतर लोकांना होत असल्याचे दिसून आलेले आहे.



🌱ज्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण 94% पेक्षा कमी आहे असे सर्व लोक ( पॉझिटिव्ह, निगेटीव्ह व इतर सर्व नॉर्मल लोक) व श्वसनास त्रास होत असलेले सर्व Co-morbid लोक ( BP, शुगर, दमा, हृदयरोग, कॅन्सर व इतर प्रतिकारशक्ती कमी करणारे आजार असणारे सर्व लोक) यांनी तात्काळ MD मेडिसिन किंवा कोरोना उपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन तात्काळ कोविड हॉस्पिटल मधे (की जीथे ऑक्सिजन बेडची सोय आहे) जाऊन ऍडमिट व्हावे.


🌷सुरुवातीच्या अवस्थेत आपण लवकर निदान करून लवकर उपचार सुरू केले तर सर्वच्या सर्व पेशंट्स यातून बरे होऊ शकतात, कारण आता कोरोनामुळे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन साठी उपचार करणारी चांगली औषधे उपलब्ध झालेली आहेत. सर्वच कोविड हॉस्पिटल्स मध्ये ही औषधे उपलब्ध झाल्याने आपण यावर खूप चांगल्या रीतीने उपचार करू शकतो.


🌸 ऑक्सिजनचे प्रमाण 90% पेक्षा कमी असलेले तसेच धाप लागणारे किंवा श्वसनास त्रास होणारे पेशंट, उशिरा ऍडमिट केले तर त्यांना वाचवणे खूप कठीण होते, मग यातील काही लोक बरे होतात व काही सिरीयस व Co Morbid पेशंटचा विनाकारण मृत्यू होतो.



अश्या रीतीने आपण जर कोरोना आजार समजून घेतला, सर्व काळजी घेतली व लवकरात लवकर वेळीच निदान करून लवकर उपचार घेतले व स्वतःला विलगिकरण केले तर आपण या आजारातून पूर्ण बरे होऊ शकतो व हा आजार मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आणू शकतो व सद्याचा मृत्युदर ही कमी करू शकतो. 100 पेशंट्स मधील 97 पेशंट्स बरे होतायत ही खूप मोठी सकारात्मक बाब आहे. येणाऱ्या काळात आपण सजग राहून सर्वोत्तम उपचार घेतल्यास 100 पैकी 99 % रुग्ण बरे होणार आहेत. त्यामुळे उगाचच पॅनिक होऊन डिप्रेशन व हार्ट अटॅक मुळे आपण मरू अशी भीती बाळगण्याच काही कारण नाही. सकारात्मक विचार हा पेशंटला लवकर बर होण्यासाठी मदत करतो.



त्यामुळे कोरोनाला अवास्तव घाबरून जाऊ नका, कोरोना व्यवस्थित समजून घ्या, बरेच दिवस घरी बसून राहिल्याने व चुकीच्या गोष्टी ऐकत राहिल्याने आपण विनाकारण डिप्रेशनमध्ये जात आहोत. म्हणून आपण Covid-19 ची अवास्तव भीती न बाळगता अतिशय सजग राहून आपण आपली स्वतःची, कुटुंबाची व आपल्या गावाची, शहराची पर्यायाने देशाची काळजी घेऊया.


चला तर मग, आपण सर्वजण मिळून, शास्त्रोक्त माहिती घेऊन, सर्व समाजाला, गावाला यात सहभागी करून कोरोनावर मात करूया... 🙏


डॉ. नितीन जाधव, आनंद हॉस्पिटल व कोव्हीड सेंटर उपजिल्हा रूग्णालय, ३२ शिराळा मध्ये आपली सेवा पुरवत आहेत.


☘️गावातील एक ना एक व्यक्तीने जर वरीप्रमाणे सर्व माहिती घेऊन, कोरोना न पसरीवण्याचा संकल्प केला तर फक्त एक ते दोन महिन्यात आपलं गाव आणि देश कोरोनामुक्त होईल यात शंकाच नाही...👍



- डॉ. नितीन जाधव,

एम.डी- मेडिसिन,

आनंद हॉस्पिटल, ३२ शिराळा

कोव्हीड सेंटर, उपजिल्हा रूग्णालय, ३२ शिराळा,

सदस्य- प्लानेट अर्थ फौन्डेशन, शिराळा

92 views0 comments
bottom of page